top of page

माझ्या स्वप्नातील भारत

धन्य धान्य पुष्प भरी, वसुंधरा ही अपुली ...|

ज्यामध्ये हा देश अपुला, साऱ्या देशांतून न्यारा ...||


ree
India in world map

गेल्या शतकापासून भारत देशाने बहुसांस्कृतिक, बहुभाषिक, बहुसामाजिक ह्या साऱ्याच वर्तुळांमध्ये स्थिर प्रगती साधली आहे. भारत देश त्याच्या प्राचीन इतिहासासाठी आणि विविधतेत असलेल्या एकतेसाठी ओळखला जातो. ह्या दशकात भारताने विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण तसेच विविध क्षेत्रांतील विकास पाहिला.


डॉ. अब्दुल कलामांनी एका लहान मुलीला विचारले, “तुझ्या स्वप्नातील भारत कसा आहे? ” तिने उत्तर दिले की, “मी विकसित भारताचे स्वप्न पाहते.” तिच्या उत्तराने ते प्रचंड प्रभावित झाले आणि प्रामाणिकपणे माझे ही हेच स्वप्न आहे. मी एका संपूर्ण विकसित भारताचे स्वप्न पाहतो. जो साऱ्या क्षेत्रांत उत्तुंग यशशिखरावर तर असेलच पण, त्यासोबतच जिथे भारताच्या अखंड संस्कृतीचा वारसा जपला गेला असेल.


असा भारत, जिथे प्रत्येक नागरिक साक्षरतेच्या छत्रछायेखाली विसावेल. कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही. जिथे ज्ञान फक्त रोजगार किंवा नोकरी मिळवण्यापुर्त मर्यादित नसेल. जे नागरिक लहानपणी शिक्षण घेऊ शकले नाहीत, त्यांना प्रौढ शिक्षणाद्वारे साक्षर बनवण्याची जबाबदारी घेतली जाईल. ज्या भारताचे सरकार “स्कील इंडिया, मुद्रा योजना, इ.” सारख्या रोजगाराच्या समान संधी प्रदान करेल. प्रत्येक नागरिक सुखी-समाधानी राहील आणि हीच भारताची खरी प्रगती ठरेल.


ree
Importance of Education

माझ्या स्वप्नातील भारत देशात, विविध वैज्ञानिक महत्त्वपूर्ण संशोधनात मग्न असतील. असा भारत, जो महान वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीसाठी ओळखला जाईल. टाटा आणि बिरलाच्या आवडी असे नवीन शोध गाठतील ज्याने संपूर्ण विश्व चकित होईल. महान देश विचार करतील की, “भारताने असाध्य ते साध्य करून दाखवले. जो देश फक्त नवनवीन शोधांचेच नेतृत्व करत नसेल तर, तो अध्यात्मामधेही तितकाच अग्रेसर असेल.


त्या भारत देशात निरंतर प्रगती आणि विकास सोबत साधले जातील. प्रत्येक नागरिक त्याच्या संपूर्ण आयुमानात १०-२० झाडे लावून त्यांचे मुलांप्रमाणे संगोपन करेल. वन्यजीवन शिकारीपासून सुरक्षित असेल, मनुष्य आणि निसर्गाचे अतूट नाते असेल. जिथे सत्यावाचून परमार्थ नसेल आणि भ्रष्टाचार नसेल, अशा भारत देशाचे मी स्वप्न पाहतो.


असा भारत, जिथे स्त्रियांचा आदर ही पहिली शिकवण असेल आणि बहुधार्मिक लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहतील. प्रत्येक भारतीयाला, भारतीय असल्याचा अभिमान असेल. ज्यामुळे संपूर्ण गुन्हेगारी क्षेत्र संपुष्टात आलेले असेल. मी एका अशा भारताचे स्वप्न पाहतोय, जिथे प्रत्येक परिसर, रस्ते नीटनेटके असतील. सुस्वच्छ्तेचे उच्च प्रमाण राखून ठेवले जाईल आणि रोगराईचे सारे प्रश्न दूर सारले जातील.



ree
Respect the Nation


माझ्या स्वप्नातील भारतात, शेतकऱ्याला कुठल्याही उच्च व्यवसायाइतका मान दिला जाईल. अंधश्रद्धेची पालंमुळं उखडून टाकलेली असतील आणि असा भारत जो विकासासोबतच खेळातही नैपुण्यशील असेल. ओलम्पिक्स आणि इतर आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये भारत अग्रेसर असेल. हा आहे माझ्या स्वप्नातील भारत, जिथे मला एक भारतीय म्हणून जगायचंय.


हा माझ्या स्वप्नातील विकसित भारत देश आहे. जो आंतरराष्ट्रीय घडामोडींसाठी, सुख-शांती-समाधानासाठी ओळखला जाईल आणि शेवटी रवींद्रनाथ टागोर यांच्या काही ओळींनी स्वप्नातील भारताला अधोरेखित करू पाहतो,


“जिथे शिर अभिमानाने उंच असेल,

जिथे चित्त भयापासून शून्य असेल.

हे ईश्वरा...! अश्या स्वातंत्र्याच्या स्वर्गात,

माझ्या निजलेल्या भारताला जागे कर...

माझ्या निजलेल्या भारताला जागे कर...”


- सार्थक निवाते   (info.sarthakfeeds@gmail.com)

Comments


Subscribe Form

  • twitter
  • linkedin
  • blogger
  • generic-social-link

©2019 by Content Sphere. Proudly created with Wix.com

bottom of page