सिंधुदुर्ग एक प्रवास
- Sarthak Niwate
- Sep 14, 2019
- 2 min read

कोकण... घनदाट हिरवी झाडी, स्वच्छ, सुंदर, अथांग सागरी किनारे, इतिहासाचा अमूल्य ठेवा जपणारे गड, किल्ले व चैतन्य प्रज्वलित करणारी मंदिरं.... कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्याची लयलूटच म्हणावी लागेल... आणि अशाच या कोकणात... ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग महाराष्ट्राच्या ओंजळीत गेली चार शतके उभा आहे. परप्रांतियांवर अंकुश ठेवण्यासाठी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरात पसरलेले आहे. या जलदुर्गावर तब्बल ५२ बुरुजांची तटबंदी साधारण ३ किलोमीटर आहे. आजही हा सिंधुदुर्ग कर्तव्यनिष्ठपणे महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान म्हणून अभेदपणे सागरीलाट झेलतं उभा आहे.
“Everybody is equally weak on the inside, just that some present their ruins as new castles and become kings –” -Simona Panova
सिंधुदुर्गाचे खास वैशिष्ठ असे की, किल्ल्याच्या परिसरात गोड्या पाण्याच्या तीन शिवकालीन विहिरी असून त्यातील पाणी आजही गोड आहे. किल्ल्याच्या चारी बाजूंनी खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक अदभूत चमत्कारच म्हणावा लागेल...
सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराष्ट्रातील एकमेव शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील मंदिर आहे. या मंदिराची स्थापना राजाराम महाराजांनी केली होती. श्री शिवराजेश्वारांचे देवालय व मंडपात महाराजांची अन्यत्र कुठल्याही किल्ल्यांवर न दिसणार बैठी प्रतिमा फक्त येथे दिसते.
महाराष्ट्राचा व महाराजांचा ठेवा जपणारा सिंधुदुर्ग राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला गेला आहे पण, सद्य परिस्थितीवर एक ओझरती नजर टाकली तर, हे सारे वैभव धोक्यात आलेले दिसून येते. किल्ल्यावर ठिकठिकाणी कचरा फेकलेला असतो. प्लास्टिक बोटल्स, खाण्यापिण्याचे पदार्थ अतिशय विकृतपणे हे सारं घडतय. महाराजांच्या भेटीला येणारा तरुण वैभवशाली किल्ल्यावर मद्यपान करून स्वतःला एकनिष्ठ मावळा म्हणवतो. अरे ... नशा असावी तर ती राष्ट्रप्रेमाची आमच्या महाराजांसारखी.... नशा असावी तर स्वराज्य स्थापनेची आमच्या महाराजांसारखी... किल्ल्यावर मद्यपान करून “आमचे महाराज” असे म्हणाऱ्या कथित मावळ्यांची गरजच नाही. ही सध्याची शोकांतिका व दुर्दैवच म्हणावं लागेल...

अथांग सागरात डौलत असलेला सिंधुदुर्ग महाराजांनी किनारी राज्यांच्या सुरक्षिततेसाठी बांधला होता. जर १६व्या शतकात तैनात केलेली सागरी सुरक्षा यशस्वी होऊ शकते तर, २१व्या शतकात २६/११ सारखा हल्ला व्हावा ....?
मनुष्य कुठंतरी इतिहास विसरतोय... आम्हीही विसरलो होतो पण, सिंधुदुर्गच्या या एका प्रवासाने सारा इतिहास मनात जागा केला आणि उर्जा निर्माण झाली ती इतिहासाला जपण्याची....!
- सार्थक निवाते (info.sarthakfeeds@gmail.com)
Comments